मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (Directorate of Medical Education and Research) पदव्युत्तर पदवी उमेदवारांची बंधपत्रित सेवा प्रक्रिया थांबवल्याने मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी (BMC Hospital Doctors) १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन (Work Stopage Movement) करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची (Residential Doctors) नियुक्ती प्रक्रिया थांबवल्याने असंतोष निर्माण झाला आहे. बंधपत्रित उमेदवारांची केंद्रीय नियुक्ती लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कामाचा व्याप आधीपासूनच अधिक आहे आणि प्रथम वर्षाची एक बॅच अजूनही आलेली नाही. त्यामुळे सध्या त्याचा भार हा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे. त्यात संचालनालयामार्फत अजूनही केंद्रीय पद्धतीने बंधपात्रित उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली नसून मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयांमध्ये होणाऱ्या वरिष्ठ निवासी अधिकारी आणि हाऊस ऑफिसर यांच्या नियुक्तीला निर्बंध लावणे चुकीचे आहे. सर्व बाबींचा विचार करता आरोग्य व्यवस्था कोलमडून जाण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती या डॉक्टरांनी व्यक्त केली.
तसेच, कोविड कालावधीमध्ये सेवा देणाऱ्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऋण निर्देश भत्ता आणि अनुभव प्रमाणपत्र अजूनही दिलेले नाही. या परिस्थितीचे अवलोकन करुन आणि आरोग्य व्यवस्था कायम टिकून राहावी यासाठी डॉक्टरांनी सदर तीन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.