
डोंबिवली : ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पुर्वीसारखी मैदानं आता राहिलेली नाही. शहरात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम वाढत जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच ज्या अस्वच्छ जागा आहे तिचा सदुपयोग केला तर ? हाच हेतू लक्षात घेत डोंबिवली शहरात चक्क उकरड्यावर वनवैभव उभारण्यात आलेलं आहे. भटकंती कट्टा, ब्रम्हांड कट्टा, भ्रमंती कट्टा अशा विशेष नामांकित कट्यांवर ज्येष्ठ महिला पुरुष योगसाधना करून आपली शारीरिक काळजी घेत असतांना अनेक शहरातून दिसून येतात. डोंबिवली सांस्कृतिक नगरीत भगवंताचे नामस्मरण आणि शारीरिक कवायतींची आवड असणारा आणि सतत स्वच्छतेच्या कार्यात मग्न असणाऱ्या डोंबिवलीतील मनसेच्या प्रल्हाद म्हात्रे यांनी पश्चिमेकडील उकरड्या बावन्नचाळ जागेवर वनवैभव उभारून त्या जागेचा कायापालट केला. त्याच निसर्गरम्य जागेवर ज्येष्ठांसाठी भ्रमंती कट्टा उभारून दिवाळीच्या सणाची एक अनोखी मेजवानी दिली आहे.
बावन्न चाळीतील रेल्वे मैदान जे पूर्वी उकिरडं होतं पण प्रल्हाद म्हात्रे यांच्या प्रयत्नाने ते नंदनवन म्हणून सर्वांच्या परिचयाचं झालेलं दिसून येत आहे. हे मैदान विरंगुळ्याचं ठिकाणाबरोबर खेळाचं मैदान अशी चर्चित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या उत्तरार्धात येथे गवत लावण्याचं काम म्हात्रे यांनी सुरू केलं होतं. पण ते वेळेअभावी अपूर्ण राहिलं होतं. या वर्षी मात्र मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला आणि भरपूर पावसाचा फायदा घेऊन मैदानात गवत लावण्याचं काम सुरू केलं. यासाठी वेदांगी म्हात्रे हिने देखील तिच्या शैक्षणिक प्रपंचातुन वेळ काढून म्हात्रे यांना मोलाची साथ दिली. आता थंडी सुरू होताच डोंबिवलीकरांना औषधी गुणधर्म असलेल्या या हिरव्यागार गवतावर मनसोक्तपणे चालता येईल. जेष्ठांसाठी बाकडे, तरुणांसाठी क्रिकेट, चांगल्या आरोग्यासाठी दुर्वा आणि एकंदरीत मोकळी हवा हे मैदान डोंबिवलीकरांना देणार आहे.
याच बावन्न चाळीतील रेल्वे मैदानात ज्येष्ठांसाठी एक योग कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा फायदा शारीरिक व्याधींना दूर ठेवण्यासाठी, फुफ्फुसांची क्षमता वाढविणे, श्वसनसंस्था मजबूत करणे, रक्तसंचारात सुधारणा, सांधेदुखीतून मुक्तता ताणतणाव आणि चिंतामुक्त जीवन शांत आणि स्थिर मन अशा शारीरिक आणि मानसिक संबंधांत सुधारणा करण्यासाठी आहे. तसेच ज्येष्ठांच्या मनातील भावना ओळखून त्यांच्यासाठी भ्रमंती योग कट्ट्याची निर्मिती केली असे मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांच्याच पुढाकाराने शहरातील ज्येष्ठांकरिता दिवाळीच्या मुहूर्तावर भ्रमंती योग कट्ट्याची निर्मिती करण्यात आली. या कट्ट्याचे लोकार्पण दिवाळीच्या निमित्ताने ज्येष्ठांनी एकत्र येऊन करण्यात आले. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना योगासने आणि प्राणायाम करण्यासाठी चौथरे व पिंपळपार तयार केले आहेत. ज्येष्ठांना बसून मोकळा श्वास घेता यावा, तसेच विरंगुळा मिळावा म्हणून जवळजवळ दीडशे बाकडे, खेळाचे मैदाने, क्रिकेट धावपट्टी, कबड्डीचे मैदान, तसेच जयंती, पुण्यतिथी सारखे कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.