साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, विविध सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गायकवाड (बापू) व संजय गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याच वेळी यशवंत उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक विचारांची जपणूक आणि वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवून देशाला भक्कम संविधान दिले. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.
तसेच नव्याने सुरू झालेल्या साहित्य सदनाच्या माध्यमातून युवकांमध्ये वाचनाची आवड वाढेल व सामाजिक जागृतीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.






