एक असा समाज ज्यात जन्म घेणं पाप करणं किंवा गुन्हा होता. एक असा समाज ज्याला माणूस म्हणून वागवणं तर लांबचीच गोष्ट पण जनावरांना मिळते तेवढी देखील किंमत या लोकांना नव्हती. त्या समजात जन्म घेतलेला एक क्रांतीसूर्य आज जगात तळपत आहे ते त्याच्या शिक्षणामुळे. परिस्थितीशी लढायचं असेल तर हाती शस्त्र हवं आणि ते शस्त्र म्हणजे शिक्षण. लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टर होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन अर्थशास्त्राची पदवी घेणारे पहिले भारतीय होते.
तो एक काळ असा होता ज्यावेळी खेड्यापाड्यातील अस्पृश्य वर्गातील तरुणांना जातीवादाचे चटके जितके गावगाड्यात बसत होते तुलनेत ते शहरात कमी होते. मिल हॉटेलमध्ये मिळेल ते काम करुन पोट भरणं आणि गावचा संसार सांभाळणं अशी एक रित होती.शहरातून गावी आलेली ही तरुण पोरं नवीन कपडे घालून यायचे. लहानगा भिवा हे सारं पाहत होता. त्यावेळी भिवाला देखील वाटलं की आपणंही असंच शहरात जावं आणि खूप पैसै कमवावेत. पण शहारात जायचं तर हाताशी पैसै पाहिजेत. म्हणून या लहान भिवाने आत्याच्या बटव्यातील हाताला येतील तितक पैसै चोरले. त्या हातात आलेले पैसै होते अवघे दोन आणे. आता एवढ्याशा पैसात शहरात जाणं कठीण होतं. आपलं शहराला जाणं कठीण आहे हे जेव्हा त्याला कळलं त्याने शहराचा नाद सोडला.
भिवाला आपण जे काही केलं त्याचं वाईट वाटलं आपण आत्याच्या पिशवीतून असे पैसै चोरले याची त्याला लाज वाटली आणि भिवाने पिशवीतले पैसै पुन्हा जागेवर ठेवले. त्यानंतर भिवाने ठरवलं की पुन्हा चोरी करणार नाही. पुढे हा भिवा मोठा झाला आणि 1913 साली अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापिठात त्यांनी शिक्षण घेतलं. लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समध्ये असताना बाबासाहेबांनी शोधप्रबंध लिहिला. 1922 चा काळ भारतात ब्रिटीशांचं राज्य होतं. त्याकाळी लिहिलेला बाबासाहोबांचा शोधप्रबंध होता तो म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपी : Its Origin and its solution. इंग्रजांच्या आर्थिक धोरणांमुळे भारताच्या रुपायाची कशी घसरण होतेय यावर त्यांनी सविस्तर लिहिलं होतं. आणि मुहुर्तमेढ रचली गेली ती भारतीय रिझर्व बँकेची. शहाराला जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास सहजसोपा नव्हता.
अन्यायाविरोधात बंड पुकारणाऱ्या या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!
(सदर लेख हा जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकावर आधारित आहे. )






