
Due to B Pharmacy paper leak in Nanded, students have to wait till 7 pm for the exam
B Pharmacy Paper Leak : नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान बी. फार्मसी तृतीय व अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर विद्यापीठाने दुपारच्या सत्रातील चालू परीक्षा तातडीने थांबवून नवीन प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला. परिणामी विद्यार्थ्यांची परीक्षा संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सुरू राहिली. लोहा येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दुपारी दोन ते पाच या वेळेत परीक्षा सुरू असताना विद्यापीठाकडून अचानक पावणेचारच्या सुमारास नवीन प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सुमारे ७५ टक्के उत्तरे लिहून पूर्ण केली होती.
अचानक पेपर बदलल्याने विद्यार्थ्यांना अपुऱ्या प्रकाशात आणि मानसिक तणावाखाली साडेपाच तास परीक्षा द्यावी लागली. यामुळे काही विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पालकांमध्येही चिंता निर्माण झाली, कारण पाच वाजता परीक्षा संपावी अशी अपेक्षा असतानाही मुली घरी न परतल्याने पालकांनी फोन लावले.
विद्यापीठाचा निर्णय ‘पेपर फुटल्याची शंका’
विद्यार्थ्यांकडून पेपर फुटल्याचे काही पुरावे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर परीक्षा विभागाने त्वरित निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख डॉ. हुशारसिंग साबळे यांनी ‘नवराष्ट्र’शी केलेली बातचित
प्रश्न: दोन प्रश्नपत्रिका देण्यात आल्या का?
उत्तर : परीक्षा सुरू होऊन दहा मिनिटांतच पहिली प्रश्नपत्रिका परत घेऊन नवीन प्रश्नपत्रिका दिल्या.
प्रश्नः लोह्यात मात्र पावणेचारला ई-मेल आला असे सांगितले जाते?
उत्तर : पेपर फुटल्याचा संशय येताच आम्ही तत्काळ निर्णय घेतला. परंतु नवीन प्रश्नपत्रिकांच्या कॉपीज काढून सीलबंद करण्यास अर्धा तास लागतो. त्यामुळे काही केंद्रांवर उशीर झाला.
प्रश्न: पेपर खरोखर फुटला का?
उत्तर : हो, शंका नव्हे तर पेपर फुटल्याची खात्री पटल्यामुळेच आम्ही नवीन प्रश्नपत्रिका दिल्या.”
प्रश्न : परीक्षा पुढे ढकलता आली असती का?
उत्तर : पेपर फुटताना आम्ही परीक्षा कशी चालू देणार? दिवस वाया जाऊ नये म्हणून त्याच दिवशी नवीन पेपर घेणे आवश्यक होते.”
प्रश्नः विद्यार्थ्यांनी ७५% लिहिले होते, है काय?
उत्तर : हे चुकीचे आहे. आम्ही दहा मिनिटांतच प्रश्नपत्रिका परत घेतल्या. एखाद्या महाविद्यालयात १०-१५ मिनिटांचा फरक झाला असेल.”
साबळे यांच्या संवादावरुन पेपर फुटल्याचा संशय मात्र बळावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पेपरमध्ये गोंधळ वाढवणारेच प्रश्न
नेमका पेपर कोठून व कसा फुटला? विद्यापीठाच्या अत्यंत गोपनीय प्रश्नपत्रिका प्रक्रियेत अशी त्रुटी कशी घडली? परीक्षा केंद्रांमध्ये वेळेतील एवढा मोठा फरक का पडला? विद्यापीठाचा परीक्षा विभाग सध्या प्रभारी नियंत्रक चालवत असल्याने शिस्त व समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चा विद्यार्थ्यांत व शिक्षकांमध्ये होत आहेत.