गोंदिया : कोरोना महामारीमुळे नियमांच्या बंधनात अडकलेल्यांना आता निर्बंध हटल्याने समारंभ साजरे करण्यास मुक्तता मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी लग्नसराई धुमधडाक्यात होऊ लागली असून त्यावर अवलंबून असलेल्या लहान – मोठ्या व्यावसायिकांचा अर्थगाडा पुन्हा रूळावर येऊ लागला आहे. यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल ४२ मुहूर्त आहेत.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे नियमांच्या बंधनात अडकल्याने जीवन पद्धतीत मोठा बदल करावा लागला. निर्बंधाच्या छायेत जीवन व्यतीत करावे लागले. सुख – दुःखाच्या प्रसंगांनाही नियम पाळतच सामोरे जावे लागले. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका व तेरवीचा निरोपही देता येऊ शकला नाही. लग्न समारंभावर आलेल्या बंधनांमुळे अनेक शेजाऱ्यांनाही त्याबाबत कळले नाही. यावर्षी प्रथमच निर्बंध हटविण्यात आल्याने लग्न समारंभांचा धुमधडाका पुन्हा सुरू झाला आहे. यंदा लग्नसराई जोरदार राहणार असल्याचे सध्या दिसून येऊ लागले आहे.
यावर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत तब्बल ४२ मूहूर्त आहेत. एप्रिलमध्ये ११, मे महिन्यात १४, जूनमध्ये १२ व जुलैमध्ये ५ मूहूर्त आहेत. या समारंभांवर अवलंबून असलेल्या मंडप, बिछायत, मंगल कार्यालये, वाजंत्री, कॅटरर्स, सजावट, फुलवाले, घोडेवाले, बेन्जो यांच्या अर्थाजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना ऑर्डर मिळू लागल्या आहेत. गेली २ वर्षे या सर्व व्यावसायिकांचा अर्थाजनाचा मार्ग अवरुद्ध झाला होता. झालेले बुकिंग रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे संबंधातही तणाव आला होता. मात्र, यंदा सर्व निर्बंध हटल्यामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात होत आहेत.
बॅण्ड पथकाला दिलासा
कोरोना संक्रमणाचा मोठा फटका बसल्यानंतर आता चांगले दिवस येऊ लागले आहेत. विशेषतः बॅण्ड पथकांतील कलाकारांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. त्यांना कोणतीच शासकीय मदतही मिळू शकली नाही. निर्बंध हटल्याने या सर्व व्यावसायिकांच्या उपजीविकेचे साधन रूळावर येऊ लागले आहे.