सिंहगड – सिंहगडावरील (Sinhgad) अतिक्रमण कारवाईला (Encroachment Action) वन विभागाकडून (Forest Department) पहाटेपासून सुरुवात झाली आहे. अतिक्रमण कारवाईसाठी सुमारे वन विभागाचे ७० अधिकारी-कर्मचारी तैनात असून कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस (Police) अधिकारी आणि ५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेते (Food Vendors) व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन तसेच नोटीस देऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने वन विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईबाबत वन विभागाने अत्यंत गोपनीयता बाळगली होती. पहाटे पाच वाजताच वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस कारवाईसाठी दाखल झाले.
कारवाईदरम्यान ७१ नोंदणीकृत व्यावसायिकांचे शेड आणि ६४ नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड असे एकूण १३५ शेड जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. दरम्यान कारवाईला काही व्यावसायिकांचा विरोध असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभाग व पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे.