
मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. पण या बैठकीपूर्वीच आघाडीत बिघाडी होतेय की काय अशी चर्चा होतेय. त्याचं कारणही तसंच आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. आपचे नेते दिलीप पांडे यांच्या विधानावरुन याची चर्चा सुरु झाली आहे.
अरविंद केजरीवाल इंडियाच्या बैठकीला उपस्थित
आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे मुंबईतील इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं कळतं आहे. कारण राजधानी दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आम आदमी पक्षाबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली.
आपकडूनही नाराजीचा सूर
तर आपकडूनही नाराजीचा सूर आवळला जातोय. जर दिल्लीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असेल तर इंडिया आघाडीच्या बैठकीला कशासाठी जायचं? अशी भूमिका आपनं घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार आहेत.
आपनं काय म्हटलंय?
दिल्लीत कुठलीही आघाडी न करण्याचा निर्णय
काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत कुठलीही आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचं आम्हाला कळतं आहे. त्यामुळं मग लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी निर्माण झालेल्या या ‘इंडिया’ आघाडीत सामिल होण्याला काही अर्थ राहत नाही, असं आप नेते दिलीप पांडे यांनी म्हटलं आहे.