माढा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उंदरगावात अडवलं
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगावात अतिवृष्टीमुळे पीकहानी व मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामध्ये सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यातच शेतकऱ्यांनी शनिवारी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बांधावरच अडवून त्यांना पुढे जाऊ न दिल्याची घटना घडली.
शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगत शेतकरी व सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संतापाचे वारे पाहता सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस नुसता धुवून काढणार
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, घरांचे पडझड, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शासनाकडून अद्याप ठोस मदत न मिळाल्याने शेतकरी वर्ग अधिकच आक्रोशित झाला आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढलेला असून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा इशारा
रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात पुढील काही तासांत व उद्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.