पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यामुळे हिरवा व कोरडा चाराही महाग झाला आहे. अशा परिस्थितीत पशुधनाचा कसा सांभाळ करावा? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पंढरपूरसह परिसरातील अनेक गावांमध्ये वातावरण बदल, कीड, अळ्या आर्दीमुळे हरभरा, ज्वारी, गहू, आदी पिकांचा उतारा कमीच आला आहे. मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असून कोरडा व ओला चारा मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पशुधनासाठी कोठून चारा आणावा हेच कळत नाही.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, भाळवणी, करकंब, रांझणी, सुस्ते, पळशी सुपली, मेंढापूर, रोपळे, तुंगत, देगाव, गादेगाव, खर्डी सिध्देवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांकडे शेळ्या, गायी, बैल व इतर जनावरे आहेत. परंतु चारा महाग झाल्यामुळे पशुधनाला उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे.
दोन आठवड्यांपासून हरभरा, गहू, ज्वारी काढणी सुरू झाली आहे. गावोगावचे मळणी यंत्र शेत शिवारात येऊन दाखल झाले आहे. कापणीला मजूर मिळत नाहीत म्हणून नाईलाजास्तव अधिकचा पैसा देऊन यंत्राद्वारे पिकांची काढणी केली जात आहे. त्यातचं पशुधनासाठी चारा शोधण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे.
शासनाने चारा डेपो उघडावेत
दोन वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. यावर्षी तर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नदीकाठीही हिरवा चारा दिसत नाही. आजमितीस ५० रुपयास पेंडी या प्रमाणे हिरवा चारा घ्यावा लागत आहे. तेव्हा चारा डेपोची गरज भासत आहे. महागाईमुळे हिरवा, कोरडा चारा घेणे परवडत नाही. शासनाने पशुधनासाठी चारा डेपो उघडणे गरजेचे आहे. जेणेकरून स्वस्त दरात पशुधनासाठी चारा घेणे सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी संजय घाडगे यांनी दिली.