
अमरावती : अमरावती जिल्ह्यात (Amravati Accident) परतवाडा-बैतूल मार्गावर दुचाकी आणि कारचा रात्री भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. या अपघातात एकूण सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश आहे. दुचाकी आणि कारच्या अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून होते. या मार्गावरील वाहतूकही बराच वेळ विस्कळीत (Traffic Jam) झाली होती.
मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असताना बोराळ येथील रहिवासी सुरेश शनवारे आणि पांडुरंग शनवारे दोघे भाऊ रविवारी रात्री परतवाडा येथे येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा गाडीने (Innova Car) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडा होऊन ईनोवा गाडीसुद्धा रस्त्याखाली उलटी झाली. या अपघातात दुचाकीस्वार सुरेश शनवारे आणि पांडुरंग शनवारे यांच्यासह इनोवामधील रमेश धुर्वे, सुरेश निर्मळ, अक्षय देशकर, प्रतीक मांडवकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय गायन हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळतात शिरजगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी संजय गायन यांना उपचारासाठी पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातामुळे परतवाडा बैतुल हा मार्ग काही वेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.