पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या नावाने आरडाओरडा करणाऱ्या व हजारे यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ करणाऱ्या राळेगणसिद्धी येथील व्यक्तीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे यांनी घटनेच्या रात्री अटक केली. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
संतोष उर्फ काळ्या बाळू पोटे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आदी आरोपांवरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि.२५) दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या घटनेने राळेगणसिद्धी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात हजारे यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलीस कर्मचारी अनिल झरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण हजारे यांचे वास्तव्य असलेल्या संत यादवबाबा मंदिरात कर्तव्य बजावत असताना आरोपी संतोष पोटे हजारे यांच्या नावाने आरडाओरडा करू लागला. त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी पोटे याने आपणास धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली.
आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपणास व तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना धक्काबुक्की करीत आरोपी पोटे घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करीत आहेत.