युवकांसाठी,युवकांचं वादळ; महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसची 'युवा आक्रोश पदयात्रा', विधिमंडळाला घालणार घेराव (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Youth Congress March Marathi News: महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, राज्यातील वाढती बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षेच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या यासह अनेक महत्वाच्या विषयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे लालमहल, पुणे ते मुंबई विधानसभा अशी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे.
युवक काँग्रेसने ही पदयात्रा बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, तरुणांचे प्रश्न मार्गी लगावेत, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा सुरू आहे. ही पदयात्रा 15 मार्च 2025 रोजी लालमहल पुणे येथून सुरू झाली असून 19 मार्च रोजी मुंबई विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पदयात्रेत संपूर्ण राज्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
युवक कांग्रेस ची सुरवात आणि युवक कांग्रेस ची ओळख युवाकांच्या समस्यांसाठी लढने, युवकांना न्याय मिळवून देणे अशी राहिली आहे. महाराष्ट्रातील युवकांची सद्यची परिस्थिति विचार करायला भाग पडणारी आहे. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती यासारख्या समस्या युवकांचे भविष्य अंधारात टाकणारे आहे. ही परिस्थिति बघता युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या संकल्पनेतून गांधीमार्गी पद्धतीने ही पदयात्रा सुरू करण्यात आली.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून युवा आक्रोश पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात युवकांना रोजगार मिळत नाही मात्र अंमली पदार्थ सहज मिळतात, शहरातील गुन्हेगारी आणि सार्वजनिक शिस्तीचा अभाव चिंतेचा विषय ठरत आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप आज विधानभवन, मुंबई येथे होणार आहे.
‘राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांना बगल दिली आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी राज्यात दरवर्षी अडीच लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते मात्र अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही तरतूद केलेली नाही. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मानधन देण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली नाही. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या जनआंदोलनाच्या माध्यामातून राज्यात वाढलेली बेरोजगारी, रोजगाराच्या कमी झालेल्या संधी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, राजकीय गुन्हेगारी व गुन्हेगारांना सत्ताधारी राजकीय पक्षांचा आश्रय याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. याशिवाय जातीयवाद, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष यासह विविध विषयावर सरकारला धारेवर धरले जाणार आहे’, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे संघटन तथा प्रशासन प्रमुख श्रीनिवास नालमवार यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आयूषी देशमुख म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात महिला अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वच स्तरातून वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु शासनाची उदासीनता दिसून येत असल्याने तसेच पोलीस प्रशासनावर वचक नसल्याने किंवा पोलीस कारवाईत काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप केला जात असल्याने महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढती बेरोजगारी, पेपर फूटी, ड्रग्सच वाढत जाळ आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हे कळीचे मुद्दे आहेत. सद्य परिस्थिति पालक आपल्या पाल्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवताना भितात, ही भीती नाहीशी झाली नाही तर भविष्यातील चित्र अधिक विदारक असेल’.
पहिल्याच दिवशी पुण्यात या पदयात्रेला शिवाजीनगर येथे पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत अडवले आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, हे आंदोलन कोणत्याही हिंसेशिवाय शांततेच्या मार्गाने पुढे नेले जात असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याच कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच म्हणण आहे.
अनेक शासकीय क्षेत्रात रिक्त पदे असूनही पदभरती केली जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या राज्यात महायुती सरकारने दाओस मधून सर्वाधिक गुंतवणूक आणण्याचा दावा केलाय. या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मिती होणार असल्याच देखील बोलल जात आहे, मात्र प्रत्यक्षात वास्तविकता वेगळी आहे. अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी उच्चशिक्षित तरुणी अर्ज करत आहेत. एखादा देश आणि त्या देशातील पिढी बरबाद करायची असेल तर सर्वात आधी तिथली शिक्षण व्यवस्था आणि युवकांची नासाडी केली जाते. देशासह राज्यातील युवकांना कॉँग्रेसकडून आशा आहेत म्हणून हजारो युवक या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. बेरोजगार युवकांना न्याय देण्यासाठी, झोपलेल्या महायुती सरकारला जागं करण्यासाठी, महाराष्ट्राचा हक्काचा रोजगार इतर राज्यात जाऊ न देण्यासाठी युवकांचा हा आक्रोश आज विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे सचिव अजित सिंग यांनी दिली.
युवकांना दर्जेदार नोकऱ्या मिळत नसल्याने उच्चशिक्षित युवक बेरोजगार बसून आहेत. येत्या काळात हे चित्र अजून विदारक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शासकीय तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करणे गरजेचे आहे, याकरिता सत्ताधाऱ्यांनी मास्टर प्लॅन तयार करून रोजगारावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.