सासवड : पुरंदर तालुक्यात तब्बल एक दशकाहून अधिक कालावधीपासून गावोगावी वृक्ष संपदा निर्माण करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील हजारो वृक्षांची लागवड करून वृक्षलागवड आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला जात आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात वनविभागाकडून त्यांना संरक्षण मिळण्याऐवजी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळेच हजारो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. तर एका प्रकरणात वन कर्मचाऱ्याला तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यामुळे वन विभागाचे पितळ उघडे पडले असून त्यांचेच अधिकारी कुरणात चरत असल्याचे दिसून आले आहे.
पुरंदर तालुक्यात बहुतेक ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत. तालुक्याच्या कोणत्याही बाजूने तालुक्यात प्रवेश करताना घाट किंवा डोंगर रस्ते पार करूनच यावे लागते. त्यामुळे वन परिसर मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच त्याला लागुनच खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. मात्र अलीकडच्या काळात एजंट सक्रीय झाल्याने गावोगावी जमिनी विकल्या जावून त्याठिकाणी गुंतवणूकदारांनी जमिनी घेतल्या. तसेच जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली स्वमालकीच्या जमिनीसह शेजारील वन विभागाच्या जागेत डोंगर पोखरून कोट्यावधी रुपयांची खडी, मुरूम, माती विकून शासनाचा महसूल बुडविला. त्याचसोबत अधिकाऱ्यांनाही मालामाल केले. त्यामुळेच वर्षानुवर्षे डोंगर च्या डोंगर पोखरले जात असताना एकही गुन्हा दाखल झालेला दिसून आला नाही.
पुण्यात चोरट्यांनी व्यावसायिकाचे घर फोडले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज जप्त
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण कडील परिंचे तसेच काळदरी खोऱ्यातील काळदरी, पानवडी, चीव्हेवाडी या परिसरात वर्षानुवर्षे माती, मुरूम चोरी केली जाते. अनेक वीट भट्ट्याना याच परिसरातून माती पुरवली जाते. यासाठी कित्येक हेक्टर जमिनीचे आणि शासकीय जमिनीचे लचकेतोड करण्यात आली आहे. या मध्ये संरक्षण करणाऱ्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने तेरी भी चूप अन मेरी भी चूप असाच मामला वर्षानुवर्षे चालू आहे. स्थानिक नागरिकांनी भर आमसभेत तक्रार करूनही वन विभाग अथवा महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.
पुरंदर तालुक्यात यावर्षी केवळ एकाच महिन्यात सर्वच्या सर्व डोंगर वेगवेगळ्या आगीत जळून अक्षरशः खाक झाले. त्यासोबतच हजारो पक्षी, प्राणी, कीटक यांची आश्रयस्थाने नष्ट झाली. हजारो वेगवेगळ्या जातीची झाडे, वन औषधी वनस्पती जळून नष्ट झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी राखलेली गवताची जळून नष्ट झाली. यातील बहुतेक आगी स्थानिक परिसरातील व्यक्तींनी लागल्याचे दिसून आल्या नंतरही वन विभागाने अधिक तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे धाडस केले नाही. विशेष म्हणजे वन विभागाकडे आग विझविण्यासाठी पुरेसी साधनसामुग्री असताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य न घेता अथवा त्यांना विश्वासात न घेता फारसी मेहनत घेतली गेली नाही. परिणामी संपूर्ण डोंगरच्या डोंगर डोळ्यादेखत जळून नष्ट झाले.
महार रेजिमेंट मुख्यालयात बाबासाहेबांचा पुतळा उभारणार : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं आश्वासन
पुरंदर तालुक्यात अद्यापपर्यंत वन विभागात लाच देणे घेणेबाबत कधी तक्रार झाल्याचे पाहायला मिळाले नसल्याने सर्व काही अलबेल असल्यासारखेच वाटत होते. मात्र साधा कर्मचारी तब्बल एक लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे उघड झाल्याने अधिकारी किती घेत असतील? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे वनांचे संरक्षण करून शासनाचा महसूल वाढविण्याऐवजी स्वतःची आर्थिक भरभराट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक नाही का ? याचे उत्तर कधी मिळणार?, असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
ज्या ठिकाणी बेकायदा कामे सुरू असतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून शासनाचा महसूल जमा करून घ्यावा. चुकीचे काम केलेल्या व्यक्तीचे कोणत्याची प्रकारे समर्थन केले जाणार नाही. याबाबत मीटिंगमध्ये सर्व कर्मचार्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या ज्या घटना घडल्या त्यातील अनेक घटनांत गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. गावागावांतील स्थानिक वन संरक्षण समितीवर अधिक लक्ष ठेवण्यात येईल.
– सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड