उदगीर : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले, तीन महिन्यात संमेलनाचे आव्हान पेलणे, कौतुकास्पद आहे. मी गोव्यातून आलोय. उदगीरबद्दल माहीत नव्हते. काहींनी येथे उन्हाळा कडक असल्याचे सांगितले.
मात्र येथील प्रेमाने उन्हाळा जाणवलाच नाही. कोकणी-मराठी नाते 600- 700 वर्षांचे आहे. संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषात रचना केल्या. तेच कोकणी भाषेचे पहिले कवी असून, 14 व्या शतकात त्यांनी कोकणीत गौळण प्रकारात रचना केल्या आहेत. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेतला पाहिजे.
चिरंतनाला धक्के देणारे साहित्य कालानुरूप असते. आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे योग्य नव्हे. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे चिअर्स लिडर्स तयार झाले आहेत, हे दुर्दैव आहे. किंबहुना, लेखक हा असा असू नये. तो बंडखोरच असला पाहिजे, असे ते म्हणाले.
मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक. कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी व मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सर्व सहकार्य करू. सर्व वाद हे संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज : अशोक चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण म्हणाले, “भाषा-भाषांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करून मराठी भाषा अधिक-अधिक समृद्ध केली पाहिजे. मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. ते अनेक भाषांचे आगर आहे. मराठवाड्यात तेलगु, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्यातरी येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पुस्तकांचे गाव उपक्रम राबविला पाहिजे.”
डीजीटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे : शिवराज पाटील चाकूरकर
माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषेतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यासारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डीजीटल आहे. त्याचा मोठया प्रमाणावर वापर होणार आहे. यासाठी डीजीटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे.”
[read_also content=”म्हाडाचे घर मिळवून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये उकळले https://www.navarashtra.com/maharashtra/millions-of-rupees-were-boiled-by-showing-greed-to-get-mhadas-house-nrdm-272104.html”]
उदगीर जिल्हा व्हावा : बसवराज पाटील नागराळकर
संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराज पाटील नागराळकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, संस्थेचा हीरक महोत्सव साजरा होतो आहे आणि महामंडळाने संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली आहे. उदगीर हा सीमा भाग आहे. मराठी, तेलगू, कानडी, हिंदी उर्दू भाषा बोलल्या जातात. या तालुक्याला इतिहास आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. ही संस्था नावाजलेली आहे. संमेलनात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. येथे बालकुमार आणि पर्यावरण यावर चर्चा होणार आहे. या परिसरात 300 स्टॉल आणि 7 भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीच्या ठिकाणी संमेलन होत आहे, असे प्रथमच होत आहे. उदगीर हा जिल्हा व्हावा अशी आमची अनेक वर्षाची मागणी आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मागणी मांडत आहोत असे ते म्हणाले.