
HSRP गाड्यांना लावून घ्याच; अनेक वेळा मुदतवाढ दिल्याने मिळणार नाही आता मुदतवाढ
नाशिक : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असून, यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतर कोणतीही सवलत दिली जाणार नसून, नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
नाशिक आरटीओच्या कार्यक्षेत्रात नाशिक, चांदवड, येवला, पेठ, सुरगाणा, निफाड, त्रंबकेश्वर, इगतपुरी, या तालुक्यांसह नाशिक महानगरपालिका क्षेत्रही समाविष्ट आहे. यापूर्वी परिवहन विभागाने अनेक वेळा मुदतवाढ दिली असल्याने आता मुदतवाढ मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. एचएसआरपीसाठी ऑनलाईन बुकिंग व पेमेंट करणाऱ्या वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित वेबसाईटची गती मंद असणे, फिटमेंटसाठी दूरच्या तारखा मिळणे, तसेच ठरलेल्या दिवशी राहूनही नंबर प्लेट बुकिंग सेंटरवर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येणे, हजर अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. तरीदेखील विभागाने आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
३ लाख ४५ हजार ५४२ वाहनांची झाली नोंद
प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक अंतर्गत एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ९ लाख ९४ हजार ८९३ इतकी वाहनांची संख्या असून, यापैकी ३ लाख ४६ हजार ५४२ वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंद एचएसआरपी पोर्टलवर केली आहे.
सहा लाख ४८ हजार वाहनांची नोंद बाकी
अजूनही ६ लाख ४८ हजार ३५१ वाहनांची एचएसआरपी पोर्टलवर नोंद होणे बाकी असल्याने उर्वरित २१ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाच वेळा मुदतवाढ देऊनही अजूनही हजारो वाहनधारकांनी नियमांचे पालन केलेले नसल्याने, ३१ डिसेंबर नंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत
३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. एचएसआरपीमुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणे सोपे होते. नागरिकांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे नियमानुसार आवश्यक आहे.
हेदेखील वाचा : ‘त्या’ 65 टक्के वाहनधारकांमध्ये तुम्ही नाही ना? राज्य सरकारडून High Security Number Plate साठी पाचव्यांदा मुदतवाढ!