कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.दरम्यान महायुतीच्या उमेदवारासाठी आलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आज कराड-दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह कॉँग्रेसवर टीका केली आहे.
देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. या ६० वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर २०१४ ते २०२४ यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सावंत म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या १०० रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ २० रुपयेच पडायचे. उरलेले ८० रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली.
काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. २०१४ पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या, याचाही लोकांनी विचार करावा. डाॅ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवली. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. सर्जिकल स्ट्राइक केला. राम मंदिर उभारणी केली. तब्बल १८० देशात योग पोहोचवला. येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या नंबरवर असेल.
माजी मुख्यमंत्र्यांनी काेणती कामे केली ?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना डॉ. सावंत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली, ती सांगावीत. २०१४ ते २०२४ पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प पूर्णत्वास केलेला नाही.
हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन
उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास रोखला, असा आरोप करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, यश मिळवले. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले. त्यांनी पुत्रासाठी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राचे विकासाला गती दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.