पंढरपूर : पंढरपूरातील जगाची माऊली श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन मागील दीड महिन्यापासून बंद होते. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे शासन निधीतून सुरू होती. त्यामुळे गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन बंद करण्यात आले होते. आता विठ्ठलभक्तांसाठी आनंदवार्ता समोर येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये पदस्पर्श दर्शन सुरु होणार आहे. मंदिर समितीकडून तारीख देखील घोषित करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दर्शन खुले होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरपूरात पुन्हा भक्तांचा ओढा वाढणार आहे. येत्या 2 जून 2024 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात येणार आहे. याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेची तयारी
आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै, 2024 रोजी पार पडणार आहे. वैष्णाचा सोहळा असणाऱ्या आषाढी यात्रेवेळ श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठया प्रमाणात वारकरी येतात. येणाऱ्या भाविकांना सुलभ व तात्काळ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप या ठिकाणी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी दोन हजार कर्मचारी व स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दिनांक 07 ते 26 जुलै दरम्यान 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिले.