मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मंत्र्यांनी अभ्यास करून उत्तरं द्यावीत, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावताच, गुलाबराव पाटील यांनी, “माझा अभ्यास आहे, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला हे खातं दिलं होतं,” असे प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांना अभ्यासपूर्वक उत्तरं द्यावीत, असा टोला लगावताच, त्यावर गुलाबराव पाटील भडकले.
Uday Samant : विधानभवनात उदय सामंतांचा मोबाईल हरवला, दरवेळी सामंतांसोबतच असं का घडतं?
आदित्य ठाकरे यांनी खोचक टिप्पणी करताच, गुलाबराव पाटील तडक उठून उभे राहिले आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. भर सभागृहात त्यांनी “अहो, यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं,” असे वक्तव्य केले. मात्र, नंतर त्यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ असा शब्द वापरून सारवासारव केली.
या प्रसंगाची सभागृहात चांगलीच चर्चा झाली. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आदेशांचं पालन केलं होतं. त्याकाळी मातोश्रीवरील आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचे. मात्र, शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर अशी टीका केली, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित प्रश्नांना उत्तर देत होते. पाणीपुरवठा आणि कृषी विषयक चर्चेदरम्यान त्यांनी “कृषी खात कधी युरिया वापरायला सांगतं, तर कधी नॅनो युरिया वापरण्याचा सल्ला देतं. यावर निर्णय घेण्यासाठी बैठक घेणे गरजेचे आहे. तसेच, शेतकऱ्यांनी शेणखताचा अधिकाधिक वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पाण्याच्या समस्येने ग्रस्त गावांमध्ये आरओ प्लांट बसवले आहेत,” अशी माहिती दिली.
Sleeping In Office: ऑफिसमध्ये थकव्याने लागली डुलकी? कारवाई होत असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाने उडेल
यावेळी उत्तर देत असताना आदित्य ठाकरे मध्येच बोलू लागले. यावर गुलाबराव पाटील यांनी “तुम्ही शांत बसा,” असे म्हणत त्यांना रोखले. यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला आणि वातावरण तापले. शेवटी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचे आदेश दिले.
आदित्य ठाकरे यांनी टीका करत म्हटले, “काहीही विचारलं की मंत्री लगेच केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. त्यांना खातं कळतंय की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.” त्यावर गुलाबराव पाटील यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
“मला खातं कळतं, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला ते खातं दिलं होतं.”
“म्हणूनच तुम्ही पळून गेलात.”
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत दोघांना वैयक्तिक टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला. तसेच, “मी हे रेकॉर्डवर घेणार नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, हा सामना सभागृहातील सर्व सदस्यांच्या चर्चेचा विषय ठरला.