आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन; VIP ट्रिटमेंट टाळत पायी जाणं केलं पसंत
पंढरपूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्याकडून आरोग्यमंत्री आबिटकर यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवार, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके उपस्थित होते.
हेदेखील वाचा : MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचारानुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना वाहतुकीचा कोणताही त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिरापर्यंत दर्शनासाठी चालत गेले.
पंढरपूर शहरात भक्तनिवासाची उभारणी
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.