Health team appointed at shelter center in Solapur Solapur News Update
Solapur News : सोलापूर : महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाडामध्ये जोरदार पाऊस झाल्याने राज्यावर ओला दुष्काळ आला. शेतकऱ्यांची पूर्ण शेती वाहून गेली आणि अगदी घरं, संसार देखील पाण्यामध्ये वाहून गेले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्याच्या करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेली आहेत. तसेच जिल्ह्यात 82 गावांमध्ये 120 तात्परते निवारा केंद्र निर्माण केलेली आहेत. या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने निवारा केंद्रांची पाहणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. उपकेंद्र हत्तुर येथील श्री सोमेश्वर मंदिरातील निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी अंतर्गत मद्रे उपकेंद्रातील सिंदखेड गावस पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मद्रे आनंद नगर तांडा, आहेरवाडी कोणापुरे शाळा, बांकळगी जिल्हा परिषद शाळा येथे निवारा केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी राहण्याची, भोजनाची व औषधोपचाराची सोय करण्यात आली असून . डॉ. संतोष नवले, डॉ. नीलिम घोगरे (तालुका आरोग्य अधिकारी) व त्यांची टीम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या. तसेच सर्व नागरिकांचे आरोग्याची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यात संगोगी ब, मैदर्गी, शेगाव व करजगी प्रा.आ. केंद्रांतर्गत पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी शिबिरास भेट दिली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य टीम, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. करमाळा तालुक्यात जातेगाव, खडकी व कामोने उपकेंद्रांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज, अकलूज येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच कंदलगाव प्रा.आ. केंद्रांतर्गत गुंजेगाव येथील आपत्तीग्रस्त निवारण केंद्रास भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करण्यात आली. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा, आरोग्य सेवा व आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या जात असून, पूरग्रस्त बाधित गावामध्ये कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरणार नाहीत या अनुषंगाने आरोग्य विभाग दक्षता घेत आहे.