फोटो सौजन्य - pinterest
रात्रीच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतूकीवर देखील परिणाम होत असल्याचं दिसत आहे. रेल्वे वाहतूक उशीराने सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. हवामान विभागाने आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई उपनगरासह नवी मुंबईत देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत सर्वत्र पाणी साचले होते. त्यानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याचा ओघ काहीसा ओसरला. पण आज संपूर्ण दिवस, पाऊस सुरु राहिला तर पुन्हा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा – बुलढाण्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू; नातेवाईक संतप्त; ग्रामपंचायतीसमोर ठेवला मृतदेह
मुंबईत येत्या 24 तासांत मुसळधार पावासाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत काल रविवारी दिवसभर पाऊस बरसत होता. त्यानंतर रात्री काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूकीचा वेग देखील मंदावला आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते आणि अशातच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यासोबlच शाळकरी विद्यार्थ्यांना देखील पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागतं आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल 15 मिनिटं उशीराने धावत आहेत. पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. पावासाचा जोर कायम राहिल्यास पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलं आहे. त्यामुळे या भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही जलमय झाला आहे. या भागांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
हेदेखील वाचा – इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जर्सी प्रथम क्रमांकावर! भारत कितव्या स्थानी जाणून घ्या
हवामान विभागाने आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, तर मध्य महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा आणि विदर्भातील भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आज नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, कोकणातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात, तर गोंदिया नागपूरसह रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस कोकण गोवा विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.