फोटो सौजन्य - pinterest
मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आझ पहाटेपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर देखील होत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 5 ते 10 मिनिटे, मध्य रेल्वे मार्गवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे आणि पश्चिम रेल्वे मार्गवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटांनी उशीराने धावत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
हेदेखील वाचा- महावितरण कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी! 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा केला सुरळीत
रेल्वेसेवा उशीराने सुरु असल्यामुळे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईच्या रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आज मुंबईतच जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. यानुसार आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, या भागांत देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज पावसाने झोडपून काढलं आहे. वाढत्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- दगडूशेठ हलवाई मंदिरात 62 ब्रम्हवृंदांच्या उपस्थितित अतिरूद्र महायज्ञ सोहळ्याची सांगता
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली या ठिकाणीतील सखल भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.पुढील 24 तास मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मुंबईत आज वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या काळात ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजपासून शनिवार 27 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तर 28 आणि 29 जुलै रोजी मुंबईत पावसाचा जोर कमी होईल. मात्र पुन्हा 30 जुलैपासून पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.