मुंबईकरांसाठी काही तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट (फोटो सौजन्य-ट्विटर)
महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मुंबईत कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना या महिन्यात पावसाने दिलासा दिला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला असून, शुक्रवारीही (5 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासून पाऊस पडत आहे, अद्याप जोरदार पाऊस झाला नसला तरी येत्या काही तासांत परिस्थिती बदलू शकते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिना पावसाने भरलेला असेल. मध्यंतरी पावसाच्या सरी आणि दिवसभर थांबलेला पाऊस यामुळे तापमानातही वाढ होताना दिसत आहे. तर गुरुवारी कुलाबा येथे 0.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 2.1 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, शुक्रवारी अनुकूल हवामानामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
शुक्रवारी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे आणि कोल्हापूर परिसरातही मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस अपेक्षित आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ सांगण्यात आले की, 5 जुलै ते 10 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर जास्त असू शकतो म्हणून त्यांनी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.