छत्रपती संभाजीनगर- सिल्लोड ,तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्रा येथे श्री. सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव दि. 26 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या यात्रा महोत्सवात आलेल्या भाविकभक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच यात्रा महोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्त, गावकरी व प्रशासनाने समनव्याने काम करावे असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
श्रीक्षेत्र धोत्रा येथील श्री. सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सिद्धेश्वर महाराज मंदिर समोरील सभामंडपात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा खातेनिहाय आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केले आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीक्षेत्र धोत्रा येथील श्री. सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सवात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, परिसर स्वच्छता, पोलिस बंदोबस्त आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. . श्री. सिद्धेश्वर महाराज हे तालुक्याचे आराध्यदैवत असून या यात्रेत मराठवाडा व इतर ठिकाणाहून भाविक यात्रे दरम्यान दर्शनासाठी येतात. त्यानुषंगाने सिल्लोड आगारातून विशेष एसटी बस सुरू करणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे, यात्रेत लावण्यात येणाऱ्या रहाट पाळण्याची काळजीपुर्वक तपासणी करून त्यांना परवानगी देणे, विद्युत सुविधा पुरविणे, स्वच्छता गृह तयार करणे, पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पोलीस बंदोबस्त, बॅरिकेट्स, आरोग्य कक्ष व औषधींचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिल्या. त्यासोबतच यात्रेत दूरवरून भाविक येतात त्यांच्यासाठी महाप्रसाद, किंवा फराळाची व्यवस्था करता येईल का या पद्धतीने नियोजन करण्यात यावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.