चांगल्यासाठी कितीही गुन्हे दाखल होऊ देत ! संजय गायकवाड यांनी ठणकावले
मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीला जोर दिला जात होता. अखेर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले होते. त्यानंतर कारवाई केली गेली. मात्र, आमदार गायकवाड यांची आक्रमक भूमिका अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.
कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ठ दर्जाचे अन्न दिल्यामुळे आमदार संजय गायकवाड हे चांगलेच संतप्त झाले होते. तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती. याच मारहाणीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. एका लोकप्रतिनिधीने अशाप्रकारे मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली जात होती. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडण्याची चिन्हे असताना चांगल्या गायकवाड यांनी कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी ‘आय डोंट केअर’, असे ठणकावून सांगितले.
गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांनी आपल्याला या कॅन्टीनमधून शिळे अन्न मिळाल्याचा आरोप केला होता. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे.
अदखलपात्र गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याची काळजी नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी कोणताही मोठा गुन्हा केला नाही. मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आय डोन्ट केअर.
मी काय भ्रष्टाचार केलाय?
गायकवाड म्हणाले, गुन्हा दाखल झाला, तर मी सामोरा जाईन. गंभीर काहीच नाही. कुणी जखमी नाही. गंभीर मारहाण नाही. बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय का? सौम्य मारहाण आहे. माझ्यावर करप्शनचा गुन्हा दाखल झालाय का? माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तो मी मान्य करत आहे. माझ्या माहितीनुसार, असा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तक्रारीचा पोलिसांना अधिकार नाही.