IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
राज्य प्रशासनात आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी, शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. प्रशासनात वेगळी छाप असलेल्या मुंढेची असंघटित कामगार आयुक्त पदावरून बदली करून दिव्यांग कल्याण विभागाचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२००५ बॅचचे अधिकारी असलेल्या मुंढेंची गेल्या २० वर्षांत त्यांची २३ वी बदली ठरली आहे. २००५ बॅचचे अधिकारी असलेल्या मुंढेंनी प्रत्येक पदावर काम करताना नियमांना प्राधान्य दिले. मात्र त्यांच्या कामाच्या शैलीमुळे अनेकदा सत्ताधारी वर्ग आणि प्रशासनातील काही मंडळी अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे.
सामान्यपणे एका अधिकाऱ्याची बदली ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर होते. पण मुंढेंच्या बाबतीत हे गणित सरासरी एक वर्षांचं ठरतंय. मुंढे कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या कारकिर्दीत त्यांनी कर्मचार्यांमध्ये शिस्त, वेळेचे भान, आणि लोकाभिमुख कारभारावर भर दिला आहे.
मुंढे आता दिव्यांग कल्याण विभागात काम करणार आहेत. हा विभाग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला असला, तरी मुंढेंच्या आगमनामुळे तेथे नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांमध्ये व्यक्त होत आहे. मंत्रालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या हजारो दिव्यांगांसाठी हा आशेचा किरण ठरू शकतो.
नितीन पाटील – महाराष्ट्र कापूस महासंघाचे संचालक पद सोडून, राज्य कर विभागात विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती.
अभय महाजन – राज्य कर विभागातून कापूस महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली.
ओंकार पवार – सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक येथे बदली.
आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर येथून महासंचालक, वनमती, नागपूरपदी नियुक्ती, तसेच मूळ पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम.