Sangli News: अवघ्या २० मिनिटांत ३५ विषय मंजूर, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न? इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर

इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या २० मिनिटांत ३५ विषय मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापले. आर्थिक विषयांवर चर्चेची संधी दिली नसल्याचा आरोप करत शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर कागद भिरकावून घोषणाबाजी केली.
इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर, महापौरांसमोर कागद भिरकावत घोषणाबाजी
इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर, महापौरांसमोर कागद भिरकावत घोषणाबाजीइचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर, महापौरांसमोर कागद भिरकावत घोषणाबाजी
Published on: 
Updated on: 

इचलकरंजी / राजेंद्र पाटील : इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहात बुधवारी लोकशाही प्रक्रियेची अक्षरशः पायमल्ली झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. शहराच्या विकासाशी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर साधी चर्चाही न करता अवघ्या २० मिनिटांत तब्बल ३५ विषय मंजूर करण्याचा धडाका महापौर उदय धातुंडे यांनी लावला. सत्तेच्या जोरावर सभागृहातील बहुमताचा वापर करून सर्व विषय एकाच दमात मंजूर करत सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभाराचे दर्शन घडविल्याचा आरोप शिवशाहू विकास आघाडीने केला. या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. विषयपत्रिकेवरील २६ आणि पुरवणी पत्रिकेवरील ९ अशा एकूण ३५ विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, सभेच्या प्रारंभापासूनच विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत विविध प्रश्न उपस्थित केले. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे जाणीवपूर्वक रोखली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर, महापौरांसमोर कागद भिरकावत घोषणाबाजी
Sangli Sugarcane Price: सांगलीत ‘भारती शुगर’कडून प्रतिटन ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर

विषयपत्रिकेवरील सर्वच विषय आर्थिक स्वरूपाचे असताना त्यावर चर्चा, प्रश्नोत्तरे किंवा साधकबाधक विचारविनिमय करण्याची संधीही विरोधकांना मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला. महापौरांनी विषयपत्रिकेबाहेरील विषयांवर चर्चा करू नये, असे आवाहन केले. मात्र, विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला.

अखेर विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी महापौरांनी सर्व ३५ विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा संपवली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी महापौरांसमोर जात कागद भिरकावत जोरदार घोषणाबाजी केली. सत्तेच्या बळावर सभागृह चालवायचे असेल तर चर्चेचे नाटक कशाला? असा सवालही उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने नगरसेविका क्रांती आवळे आणि नगरसेवक अमरजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समांतर सभा घेण्यात आली. या सभेत महापालिकेतील कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. बहुमत म्हणजे मनमानी करण्याचा परवाना नव्हे, आर्थिक विषयांवर चर्चा टाळून शहराच्या पैशांबाबत निर्णय घेणे म्हणजे जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

अवघ्या २० मिनिटांत ३५ विषय मंजूर करण्याच्या या प्रकारामुळे महापालिकेतील सत्ताधारी-विरोधक संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर, महापौरांसमोर कागद भिरकावत घोषणाबाजी
Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा