सालेकसा : येथील सालेकसा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने दोन वर्षांपासून नित्यनिधी ठेव कालावधी पूर्ण होऊनसुद्धा ग्राहकांना त्यांची नित्यनिधी ठेव रक्कम अदा केली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित ग्राहकांनी पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्याची माहिती दिली. कोरोना काळापासून पतसंस्थेकडून कर्ज वसुली झाली नसल्याने संस्थेकडे नियमित ग्राहकांना देयके देण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे उघडकीस आले आहे.
वीजबिल भरणा केंद्र पतसंस्थेकडे असल्याने त्यातून येणाऱ्या पैशाच्या जोरावर किमान बँकेतील कर्मचाऱ्यांचे पगार देणे होत आहे. परंतु, ग्राहकांना त्यांची नियमित ठेव रकमेची मुदत पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नाहीत. ग्राहकांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी खुलासा करत स्वत:च्या निकटवर्तीय आणि कुटुंबातील लोकांना पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्ज वाटप केल्याचा आरोप केला आहे. तसेच जे कर्जधारक बँकेचे नियमित ग्राहक नाहीत, त्यांना कर्ज वाटप करून नियमित ठेव रक्कम जमा करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक पतसंस्थेच्या माध्यमातून झाली आहे, असा आरोपदेखील करण्यात आला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ग्राहकांनी एजेंटकडे जमा केलेली रक्कम एजंटच्या माध्यमातून पुस्तकावर दाखविण्यात आली. परंतु, पतसंस्थेकडे त्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या ठेव रकमेबद्दल चौकशी केली असता बँकेत त्याची कोणतीही नोंद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कुंपणच शेत खात आहे, असे तक्रारदार ग्राहकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या पतसंस्थेच्या सर्व एजंटांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, पतसंस्थेत गुंतवणूक केलेली रक्कम त्वरित परत मिळावी, यासाठी शासनाने मध्यस्थी करून समितीची नेमणूक करावी व चौकशी करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. जोपर्यंत प्रत्येक ग्राहकांचे पैसे परत केले जात नाही, तोपर्यंत शासनाने या पतसंस्थेवर प्रशासक नेमून पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्याचीही मागणी पत्रकार परिषदेतून ग्राहकांनी केली आहे.
कर्जदार झाले गब्बर
पतसंस्थेने गावातील मोठे व्यापारी, दिग्गज नेते व कुटुंबातील व्यक्ती अशा लोकांना कर्ज वाटप केले. परंतु, अशा सर्व लोकांनी पतसंस्थेचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला. यातून बँकेकडे येणारी नियमित वसुलीसुद्धा बंद झाली. त्यामुळे पतसंस्थेला वसुली बंद झाल्याचा मोठा फटका बसला. निवडक काही लोकांना खूश करण्याच्या नादात मात्र, संपूर्ण पतसंस्था डबघाईला आली असल्याचे चित्र दिसून येते.
वासुदेव चुटे, अध्यक्ष, आदर्श बिगरशेती सहकारी पतसंस्था, सालेकसा
पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाही. झालेले आरोप बिनबुडाचे आहेत. संस्थेची आर्थिक व्यवहाराची कामे सुरळीत सुरू आहेत. तसेच कर्ज दिलेल्या व्यक्तींकडून वसुली सातत्याने सुरू असल्याने पूर्ववत स्थिती येण्यास फार कालावधी लागणार नाही. कोरोना महामारीमुळे काही अडचणींना तोड द्यावे लागत आहे. मात्र, घोटाळा झाल्याचा आरोप चुकीचा आहे.