महाबळेश्वर : सुशोभीकरणाच्या कामाचा वेग वाढवा, अशा सूचना सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांना दिल्या. पालिकेच्या वतीने बाजारपेठ सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील याही उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर पालिकेने बाजारपेठ सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार बाजारपेठ सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक व पेटीट ग्रंथालय इमारतीचे इमारतीचे मजबूतीकरण त्याचप्रमाणे बाजारपेठ मस्जिद रोड व गणेश पेठ या तीन रस्त्यांवर भुयारी वीज पुरवठा खाउगल्ली निर्मिती या कामांचा समावेश आहे. यापैकी पेटीट ग्रंथालयाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील रस्त्यांवरील डांबरीरस्ता काढून त्याठिकाणी काळे दगड बसविण्यात येणार आहे.
या कामाचा नमुना तयार करण्यात आला आहे, अशा सर्व कामांची पाहणी जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी केली. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पालिस निरीक्षक संदीप भागवत, माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, आर्किटेक्ट पंकज जोशी, वरिष्ठ लिपीक आबाजी ठोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरात सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून, शहरात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने कामात अडथळा येत आहे. परंतु, आता हंगाम पुढील सप्ताहात संपेल तेव्हा या कामाची गती वाढविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी केली. कामाची मुदत पाहता पावसाळ्यात काम बंद ठेवणे शक्य नसल्याने जे काम करता येईल ते काम पावसाळ्यात देखील करून घ्या. काम कोणत्याही स्थितीत बंद करू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.