
फोटो सौजन्य- MP Art/Shutterstock
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्वाइन फ्लूची प्रकरणे वाढत आहेत. 15 जूनपर्यंत, 15 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि राज्यात 432 रुग्णांची नोंद झाली आहे. प्रादुर्भावाची ही आकडेवारी काळजीत टाकणारी आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण दाखल होत आहेत. आता तर पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांचा धोका अधिक वाढतो तसेच त्यामुळे मुंबईसर राज्यातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षीही स्वाइन फ्लूमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. तब्बल 1231 रुग्णांची नोंद झाली होती आणि 32 लोकांचा मृत्यू झाला होता. यंदाही पावसाच्या कमतरतेमुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे विषाणूंचा प्रसार आणि वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरस. हा एक संसर्गजन्य रोग आहे. स्वाईन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचं आढळले होते. त्यानंतर हा आजाराचा प्रसार प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचला. खोकणे, शिंकणे आणि उघड्यावर थुंकणे याद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये या रोगाचा प्रसार होतो. दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हा विषाणू बोटांनी डोळ्याच्या,नाकाच्या आणि तोंडाच्या संपर्कात येतो त्यानंतर शरीरामध्ये पसरतो. स्वाइन फ्लूच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 7 दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. 2009 साली जागतिक आरोग्य संघटनेने स्वाइन फ्लू रोगास महामारी म्हणून घोषित केले होते.