सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एंट्री केली. दहा वर्षे काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल पाटील यांना यश आले.
महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला. या पराभवाने संजयकाकांची हॅट्रिक हुकली. महाविकास आघाडीचे चंद्रहार यांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. त्यांच्यासह 18 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसचे अपक्ष ‘विशाल’ विजयाने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासह जिल्ह्याच्या विविध भागात आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला.
सांगली-मिरज रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व निवडणूक निरीक्षक बी. परमेश्वरम यांनी मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पोस्टल, मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटची कडक बंदोबस्तात मोजणी सुरू झाली.
दरम्यान, लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासह 20 उमेदवार रिंगणात होते.
निवडणुकीत 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 18 लाख 68 हजार 174 मतदारांपैकी 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदान केले. सन 2019 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी मतदान घटले होते. त्यामुळे कमी मतदानाचा टक्का कुणाला धक्का देणार याबाब प्रचंड उत्सुकता होती.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता. काँग्रेस हद्दपार होण्याच्या चर्चेने विशाल यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याने चंद्रहार एकाकी पडले.
दुसरीकडे संजयकाकांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी या पाच मतदारसंघात विशाल पाटील यांनाच मताधिक्य मिळाले.
सांगलीत उमेदवारनिहाय मिळालेली मत
विशाल पाटील अपक्ष 5,69,651
संजयकाका पाटील भाजप 4,69,392
चंद्रहार पाटील उबाठा 60,155
टिपूसुलतान पटवेगार बसपा 5,502
महेश खराडे स्वाभिमानी 5,491
आनंद नलगे बळीराजा पार्टी 3,531
सतिश कदम हिंदुस्थान पार्टी 2,851
प्रकाश शेंडगे अपक्ष 8,150
नोटा 6,512