शिरीषकुमार महामुनी, सोलापूर: माढा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदारांच्या चिरंजीवांसह इच्छुक असलेल्या उमेदवारांची एकच मागणी तिही तुतारी. त्यामुळे माढा मतदारसंघातून कोणाला तुतारी मिळणार आणि कोणाची पिपाणी वाजणार याकडे साऱ्या माढा मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.
विद्यमान आ.बबनदादा शिंदे हे मूळचे राष्ट्रवादीचेच परंतू ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले त्यावेळी आ. शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खा.निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी आ.शिंदे पिता-पुत्रांनी मतदार संघ पिंजून काढला मात्र हा मतदारसंघ पवार साहेबांच्या विचारधारेचा असल्याने लोकसभा निवडणुकीत आमदार साहेबांचे फारसे काही चालले नाही.
मतदारांनी आमदार शिंदे यांच्या विरोधात कौल दिला आणि माढ्यातून सुमारे 50 हजारांहून अधिक मताधिक्य तुतारीच्या चिन्हावर उभे असलेले पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाले. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पवार साहेबांनी उमेदवार दिले त्या त्या ठिकाणी अशीच स्थिती पहायला मिळाली. लोकसभेत तुतारीचा आवाज घुमला. लोकसभेला जनतेने दिलेला कौल पाहून विधानसभेला तुतारीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली.
सहा टर्म माढा मतदार संघात वर्चस्व गाजवलेले आ. बबनदादा शिंदे यांनी वाऱ्याचा रोख ओळखून सर्व विरोधकांवर मात करण्यासाठी थेट पवार साहेबांची तीनवेळा भेट घेऊन चिरंजीव रणजित शिंदे यांच्यासाठी तुतारीकडून उमेदवारी मागितली अशी चर्चा आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! पोटच्या पोरीवर नराधम बापाकडून अत्याचार; धक्कादायक प्रकार उघडकीस
आमदार शिंदे हे सलग सहावेळा विजयी उमेदवार आहेत त्यांचे मतदार संघात मोठे वर्चस्वही आहे. त्यामुळे पवार साहेब सुबह का भुला शाम को घर वापिस आया म्हणून माफ करून त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देतील का असा प्रश्न इच्छुकांच्या मनात निर्माण झाल्याने माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना घेरण्यासाठी माढा मतदार संघातून जोरदार मोर्चेबांधणी होत असून विद्यमान आमदारांच्या विरोधात सर्व विरोधक इच्छुक उमेदवार एकवटले असून टेंभूर्णी येथे घेण्यात आलेल्या वज्रमुठ सभेत इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी एकदिलाने विद्यमान आमदारांविरुद्ध सर्वांनी मिळून लढा देण्याची तयारी या इच्छुकांनी दाखवली आहे. आता ना.शरद पवार साहेब यापैकी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्व इच्छुकांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या माढा मतदार संघाकडे लागून राहिले आहे.
विरोधकांची वज्रमुठ सोडवण्यात आ.बबनदादा शिंदे हे यशस्वी होतील का की विरोधक आपली ही वज्रमुठ आणखी बळकट करण्यात यशस्वी होतात .यावर पवार साहेब कोणता निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: इस्रायलच्या तुलनेत भारताचे सैन्य किती शक्तिशाली? जाणून घ्या युद्ध झाले तर कोण