संग्रहित फोटो
पुणे : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला काळीमा फासणारी घटना घडली असून, पोटच्या ११ वर्षाच्या मुलीवर वडिलच अश्लील व्हिडिओ दाखवून एक वर्षांपासून अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी नराधम वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत. शाळेतील बॅड टच गुड टच कार्यक्रमामधून हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाळेतील ५७ वर्षीय शिक्षिकीने वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३५ वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित शाळेकडून गुड टच बॅड टच या कार्यक्रमाद्वारे मुलींचे समुपदेशन केले जाते होते. तेव्हा शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या पिडित मुलीचे समुपदेशन सुरू असताना तिने वडिलांकडून जबरदस्तीने मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून वारंवार शारीरीक संबंध ठेवले जात असल्याचे सांगितले. गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी हा प्रकार वारंवार केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर शिक्षिकांनी पोलिसांकडे धाव घेतली. नंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक ओलेकर करीत आहेत.
दरम्यान, महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलींना अशा घटनांपासून कसे सावध रहावे, यासाठी शाळा व महाविद्यालयाकडून बॅड टच गुड टच हे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातून अशा धक्कादायक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडून देखील अधून-मधून असे कार्यक्रम घेतले जात आहे.