मुंबई : अयोध्येमध्ये २२ तारखेला नवीन राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना रामजन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. काँग्रेस नेत्यांनी आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी अयोध्येतील सोहळ्याला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
उद्धव ठाकरे याच दिवशी काळाराम मंदिरात जाणार
बाबरी मशीद पतनावेळी शिवसैनिकांची भूमिका महत्त्वाची होती, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आता राम मंदिर उभारले असताना आणि सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना ठाकरे गट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांना रामजन्मभूमी ट्रस्टच्या वतीने निमंत्रण मिळाल्याची माहिती येत आहे. उद्धव ठाकरेंचा त्याच दिवशी नाशिक दौरा आहे. ते काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यामुळे ते निमंत्रण स्वीकारतात की प्रतिनिधी पाठवतात, हे लवकरच कळणार आहे.