
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि सुशासनाची परंपरा आता जागतिक स्तरावर अधिक व्यापकपणे पोहोचणार आहे. इस्त्रायलच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाने (Consulate General) इस्त्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. 6 जून या शिवराज्याभिषेकाच्या पावन दिवसावर घेण्यात आला असून, हा निर्णय फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठीही गौरवाची गोष्ट आहे. या निर्णयाला भारत-इस्त्रायलच्या मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात असं मानलं जात आहे.
मुंबईतील इस्त्रायलचे कॉन्सल जनरल यानिव रेवाच यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इस्त्रायलमधील एका प्रमुख शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना मांडली. महाराजांचे भारताच्या इतिहासातील स्थान, त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ! जाणून …
इस्त्रायलचे कॉन्सल जनरल यानिव रेवाच यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, इस्त्रायलमध्ये उभारली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही भारत-इस्त्रायल मैत्रीचे एक शक्तिशाली प्रतीक ठरेल. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू समुदायातील ऐतिहासिक संबंध तसेच आज इस्त्रायलमध्ये विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या त्या समुदायाच्या वंशजांचा गौरव करण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत इस्त्रायल सरकारचे आभार मानले. त्यांनी ही योजना “ऐतिहासिक आणि अभिमानास्पद” असल्याचे म्हटले. महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ स्मारक नसून महाराष्ट्र आणि इस्त्रायल यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणारा दुवा ठरेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Chattrapati Shivaji Maharaj: शिवराय ‘छत्रपती’ कसे झाले? स्वराज्याची …
गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्त्रायल यांच्यात संरक्षण, तंत्रज्ञान, शेती, जलव्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या माध्यमातून या संबंधांना सांस्कृतिक परिमाणही प्राप्त होणार आहे. महाराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
इस्त्रायलमध्ये उभारली जाणारी ही प्रतिमा केवळ एका महान योद्ध्याचा सन्मान नसून भारत-इस्त्रायल मैत्रीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक प्रभावाचे प्रतीक ठरणार आहे.