जत शहराला हवे सुसज्ज बसस्थानक
जत : जत बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना दररोज अनेक समास्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अखेर जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी थेट राज्याचे परिवहन मंत्री यांना पत्र लिहून जत शहरात आधुनिक, स्वच्छ व सर्वसुविधांनी युक्त असे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी केली आहे.
जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. शहर हे तालुक्याचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र, सध्याचे बसस्थानक अत्यंत गैरसोयीचे व अपुरे पडत असल्याने प्रवाशांना अनेक समाश्याना सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे प्रवाश्यांना पावसात भिजावे लागते, तसेच उन्हात थांबावे लागते. बसस्थानकात स्वच्छतागृह आहेत, पण त्यांची स्वच्छता राखली जात नाही. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसलेने परिणामी विकतचे पाणी घ्यावे लागते.
प्रतिक्षालय आदी मूलभूत सुविधा देखील अपुऱ्या आहेत. ‘प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी व जत शहराची वाढती लोकसंख्या, व्यापारीदृष्ट्या वाढती गरज लक्षात घेता इमारतीसह सुसज्ज बसस्थानक उभारणे ही काळाची गरज आहे’, असे पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या मागणीस जनतेकडून देखील मोठा पाठिंबा मिळत असून, लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकारी, एमएसआरटीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून पाठपुरावा केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जत बस स्थानकातील हिरकणी कक्ष हा फक्त नावालाच झाला आहे. तेथे स्वच्छता राखली जात नसल्याने महिला वर्गांकडून त्याचा वापर केला जात नाही. परिणामी, हिरकणी कक्षाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
टवाळकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला
जत बस स्थानक परिसरात टवाळकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. महिला व मुलींची छेड काढणे तसेच तेथील सुरक्षा रक्षकांना दमदाटी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
जत तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका
जत तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची संख्या देखील मोठी असल्याने जत आगार उत्पन्नात देखील अग्रेसर आहे. परंतु वाहनांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम प्रवाशांबरोबरच अधिकारी व कर्मचारी वर्गांना सहन करावा लागतो. हिरकणी कक्षा बाबत त्यांना विचारले असता टवाळखोरांकडून त्याचा उपयोग गैरवर्तन व धूम्रपानासाठी केला जात असल्याने हिरकणी कक्ष आम्ही सुरू ठेवला नसल्याचे त्यांनी सांगितले.