
जावळी तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करणारच : सौरभ शिंदे
मेढा : जावली तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली असून, पावसाअभावी शेती पिके करपून गेल्याने खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे. जावळी तालुक्याचे प्रमुख पीक असणारी भात शेती पाण्याअभावी वाळून गेली आहे. तसेच अनेक गावांना आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत जावळी तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश जरी नसला तरी तो समावेश करून घेण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती सौरभ शिंदे यांनी दिली.
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत जावळी तालुक्याचा समावेश झालेला नाही. याबाबत असणाऱ्या निकषांची चाचणी करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे यांनी सांगितले.
‘ट्रिगर वन’च्या यादीला शासनाने काय निकष लावले याचा अभ्यास करून त्वरित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना त्याचा अहवाल देऊन आपला जावळी तालुका हा या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जातील. ट्रिगर वनच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत जावळीचा समावेश करून घेणारच असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.