कर्जतमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार का ?
वाहतूक कोडींची समस्या नियंत्रणात येण्यासाठी महेंद्र थोरवेंची महत्वाची बैठक
वाहतूक कोंडीचे अडथळे कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना
कर्जत/ संतोष पेरणे : शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर गेली काही महिने सतत वाहतूक कोंडी होत आहे.दररोज होणारी वाहतूक कोंडी शनिवार रविवारी वाहनांसाठी तासनतास पर्यंत वाढत चालली आहे.दरम्यान या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी कर्जत पोलिसांना पूर्ण अधिकार आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्जत नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांच्या माध्यमातून कर्जत चार फाटा तसेच श्रीराम पुल पर्यंत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेट्स बसविले जात आहेत.
कर्जत तालुका फार्म हाऊसचा तालुका समजला जातो आणि त्यामुळे विकेंड साठी पर्यटक कर्जत तालुक्यात येत असतात.त्या वाहनांचा थेट परिणाम कर्जत तालुक्यातील सर्व रस्त्यांवर दिसून आला असून आज कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते हे वाहनांमुळे भरून गेले होते.कर्जत तालुक्यातील असलेल्या फार्म हाऊस आणि रिसॉर्ट तसेच माथेरान या पर्यटन स्थळी येणारे पर्यटक यांच्यामुळे कर्जत तालुक्यातील रस्ते वाहनांमुळे वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी असतात.फॉर्म हाउस बरोबर कर्जत तालुक्यातील धबधबे तसेच पाणवठे या ठिकाणी पर्यटक बहुसंख्येने येत असतात. त्या पर्यटकांमुळे देखील कर्जत तालुक्यातील रस्ते वाहनांनी भरले होते.हे सर्व रस्ते वाहनांनी भरून गेल्याने कर्जत तालुक्यातील स्थानिक लोकांना घराबाहेर पडणे कठीण होऊन गेले होते.त्यामुळे कर्जत तालुका शनिवार आणि रविवार चा दिवस बाहेरच्या वाहनांमुळे स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना
कर्जत चार फाटा येथे कर्जत शहर मुरबाड रस्ता तसेच नेरळ माथेरान कडे जाणारी वाहने यांच्यामुळे वाहतूक कोंडी सकाळ पासून दिवसभर पाहायला मिळाली.ही वाहतूक कोंडी या वर्षातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी होती.कारण पलीकडे कर्जत शहराकडे जाणारी वाहतूक कोंडी श्रीराम पुल आणि पुढे मार्केट यार्ड पर्यंत कायम असते.त्या दोन्ही मार्गावर ही वाहतील कोंडी असल्याने कर्जत शहरातील परिसरातील गावकरी यांना देखील कर्जत बाजारपेठेत येता येत नाहीत.त्यामुळे कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत प्रशासनाची बैठक घेऊन सर्व अधिकार पोलिस प्रशासनाला देऊन वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
चार फाटा ते श्रीराम पुल भागात एकेरी रस्ता
याचपार्श्वभूमीवर, कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी वाहतूक कोंडीचे अडथळे तसेच उपाययोजना यांचा अभ्यास केला.त्यानुसार रस्त्याच्या मधोमध बॅरिकेट्स बसविले पाहिजे तसेच ट्रॅफिक सिग्नल अशी व्यवस्था केली पाहिजे असे नियोजन करून कामाला सुरुवात केली आहे.पोलिस दलाला सोबत घेऊन पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी कर्जत चार फाटा ते श्रीराम पुल या भागात एकेरी रस्ता असलेल्या ठिकाणी मध्यभागी बॅरिकेट्स बसविण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे वाहनानचालक यांना वाहतूक शिस्त लागू शकते.तसेच वाहने एका मार्गाने पुढे पुढे गेल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते.तर कोणतेही वाहन ओव्हरटेक करून पुढे जाणार नाही आणि वाहतूक कोंडी देखील होणार नाही.कर्जत पोलिसांकडून सुरू असलेल्या या सकारात्मक कार्यवाहीबद्दल कौतुक होत आहे.