राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला संबोधित करताना घाटगे बोलत होते. गैबी चौकातून या मोर्चास सुरुवात करण्यात आली. शहराच्या मुख्य रस्त्याने निषेधाच्या घोषणा देत मोर्चा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आणण्यात आला. या ठिकाणीही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
घाटगे पुढे म्हणाले, हा मोर्चा भाजपचा नसून तो भारतीय जनतेचा आहे. नवाब मलिक यांनी ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली. त्या लोकांनी त्या पैशातून १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक मारले गेले.
नवाब मलिक यांचे कृत्य म्हणजे महाराष्ट्राचा अवमान आहे, यासाठी त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील मंत्र्यांना आम्ही स्वस्थ बसू देणार नाही.
अनिल देशमुख यांच्यासाठी राष्ट्रवादीचे लोक रस्त्यावर आले नाहीत. मग नबाब मालिकांसाठी हे लोक रस्त्यावर का आले असा प्रश्न उपस्थित करून मलिक यांच्या पाठिंब्यासाठी कागलमध्ये ही रॅली काढली जाते हे दुर्दैव आहे. ज्यांनी ही रॅली काढली त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी राष्ट्रवादी या शब्दाचा अर्थ समजावून घेऊन त्याचा मान राखावा.
आज राज्यात एसटी कर्मचारी संप पूरग्रस्त, शेतकरी, वीज बिल यासारखे अनेक प्रश्न महाविकास आघाडी समोर आहेत. ते सोडवण्यासाठी शासनाकडे वेळ नाही मात्र मालिकांसाठी आंदोलन करण्यासाठी वेळ आहे. मात्र, अशा नवाब मलिक यांनी केलेल्या कृत्याबाबत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी राजेंद्र जाधव, असिफ मुल्ला, अरुण सोनुले, रमीज मुजावर, संजय पाटील, बाबगोंड पाटील यांची भाषणे झाली.