उपचार वेळेत न मिळाल्याने महिलेची वाहनातच प्रसूती; बाळाचा दुर्दैवी मृत्यू
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून एका महिलेची वाहनातच प्रसूती झाली. मात्र, दुर्दैवाने त्यात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.३० सुमारास घडली.
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून एका महिलेची वाहनातच प्रसूती झाली. मात्र, दुर्दैवाने त्यात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.३० सुमारास घडली. या घटनेनंतर शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शोमिका महाडिक, हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील यांनी तात्काळ आरोग्य केंद्राला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा मागणी केली.
शिरोली शास्त्रीनगर येथील एक गरोदर महिला त्यांच्या कुटुंबासमवेत खासगी गाडीतून दवाखान्यात आली होती. तिच्या पोटात प्रसूतीच्या कळा खूप चालू होत्या. सदर महिला दवाखान्याच्या दारात खासगी गाडीत टाहो फोडीत होती. दरम्यान, शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी परिचारिका हजर नसल्याने केवळ उपचाराअभावी तिला असहाय्य झाल्याने त्याच गाडीत महिला प्रसूत झाली. पण बाळ मृत झाले. या महिला प्रसूत होऊन तिचे बाळ मयत झाल्याची बातमी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शशिकांत खवरे व उपसरपंच सुरेश यादव यांना युवा कार्यकर्ते निलेश शिंदे व पवन कांबळे यांनी दिली असता तात्काळ लोकनियुक्त सरपंच यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. जेसिका अँड्र्यूज व परिचारिका यांना सदर घटनेबद्दल धारेवर धरून जाब विचारत सरपंच शशिकांत खवरे यांनी आक्रमक होऊन तीव्र संताप व्यक्त करून जाब विचारला.
या घटनेस आपण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच व पीडित कुटुंबासह गावातील कार्यकर्ते यांच्यासमवेत दवाखान्याच्या पायरीवरच ठिय्या आंदोलन करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेस जबाबदार कर्मचारी यांच्यावर पोलीस कार्यवाही झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. डॉ. जेसिका अँड्र्यूज यांनी दोषी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही व निलंबन करण्याची भूमिका व्यक्त केल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
Web Title: Delivery of the woman in the vehicle due to untimely treatment unfortunate death of a baby nrka