
वारणानगर : येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून १२ टक्के वेतनवाढ कारखान्याचे चेअरमन आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी जाहीर केली. वेतनवाढीचे श्री वारणा साखर कामगार संघाने स्वागत करून संचालक मंडळाचा सत्कार केला.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर साखर कामगारांची वेतनवाढीची मागणी गेली काही वर्षे सुरू होती. याबाबत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष, शासन प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी या त्रिस्तरीय समितीने वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेत साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ सुचवली होती. त्याची अंमलबजावणी आमदार विनय कोरे यानी तात्काळ केली.
वारणा कारखान्याचे चेअरमन विनय कोरे, व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत व संचालक मंडळाने सर्वच कामगारांना जानेवारीपासून १२ टक्के वेतनवाढ लागू केली.
श्री वारणा साखर कामगार संघ (इंटक) चे महादेव पाटील, मधुकर पोवार, नाना कापरे, अविनाश पाटील, आर.के. पाटील, महेश पाटील, विलास काटे, भारत यादव, दीपक खोत यासह अन्य सदस्यांनी वेतनवाढीचे स्वागत करून संचालक मंडळाचा फेटा बांधून सत्कार केला.