Kunbi community mahamorcha on for OBC reservation at Azad Maidan Mumbai News Update
Reservation Protest on Azad Maidan : मुंबई : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारला जाणार आहे. यापूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन केले. गणेशोत्सव काळात जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. आता पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये आरक्षणासाठी लढा दिला जाणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर आज (दि.09 ऑक्टो) कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चाचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आंदोलकांनी डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या घातलेल्या दिसून येत आहेत. त्याचबरोबर या आरक्षणाविरोधात निषेधाचे फलक घेतले असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाच्या या एल्गार मोर्चेमुळे आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमक्या मागण्या काय?
आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या कुणबी महाप्रचंड मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मैदानामध्ये भव्य मंच उभारण्यात आला असून शेकडो कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या समोर आल्या आहेत. यामध्ये ५८ लाख नोंदी रद्द करा: मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होऊ नये यासाठी सरकारने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदी तात्काळ रद्द कराव्यात. शिंदे समिती बरखास्त करा: मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी. ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा.जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करावेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि दोन समित्यांच्या शिफारसी त्वरित अमलात आणाव्यात, अशा मागण्या ओबीसी समाजाकडून करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जरांगे पाटील यांचे आंदोलन
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. अंतरवली सराटी येथून मोर्चा आणि आझाद मैदानावर त्यांनी उपोषण केले. मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये येत आंदोलन केले. जरांगे पाटील यांच्यासह लाखो समर्थक आणि कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाले होते. यावेळी जरांगे पाटील यांच्या 9 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. यामध्ये सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावी ही प्रमुख मागणी मान्य होती. याबाबत जीआर काढत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पाच दिवस सुरु असलेल्या या जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता ओबीसी समाजाने आझाद मैदानावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.