अखेर ' क्रांती ' चे अध्यक्ष शरद लाड यांचा भाजपा मध्ये प्रवेश
पलूस : अनेक दिवसांपासून रेंगाळलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुख्यालयात शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी समर्थकांनी ‘शरद भाऊ आगे तुम बढो, हम तुम्हारे साथ है, पलूस कडेगावमध्ये एकच भाऊ शरद भाऊ शरद भाऊ’ या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.
प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. या मजबूत नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अधिक सशक्त करण्यासाठी सर्वांनी सन्मान करणे आवश्यक आहे. शरद लाड यांनी आमच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
शरद लाड म्हणाले, आज नव्या प्रवासाची सुरुवात करताना मनात भावनांचा महासागर उसळतो आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनाशी बाळगून, त्या दिशेने सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प करत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा क्षण माझ्यासाठी आनंद, अभिमान आणि नव्या जबाबदारीची जाणीव घेऊन आलेला आहे. आपण आता एका ठाम विचारधारेच्या, राष्ट्रहित आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या पक्षाचे घटक बनत आहोत.
हेदेखील वाचा : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; 41 पैकी तब्बल 21 जागांवर महिलांना संधी
तसेच ‘देश प्रथम’ ही भावना अंतःकरणात बाळगून, खऱ्या अर्थाने विकासासाठी झटणाऱ्या या पक्षाचा ध्वज हातात घेणे हे माझ्यासाठी गौरवाचं आणि प्रेरणेचं कारण आहे. पलूस-कडेगावात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या झेंड्याखाली ताकदीने लढवणार आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुधीर गाडगीळ, मनोज घोरपडे, सत्यजीत देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, अमल महाडीक, पृथ्वीराज देशमुख , संग्राम देशमुख, समीत कदम, राहुल महाडीक, अमोल बालवडकर, कौस्तुभ गावडे, राजाराम गरुड, पोपट सपकाळ, नितिन नवले, सुकुमार पाटील, संग्राम जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत शरद लाड?
शरद लाड हे कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. क्रांतीचे फिल्ड मार्शल, स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू यांचे नातू आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे पुत्र आहेत. जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड यांचे पुतणे आहेत.
शरद लाड यांची राजकीय पार्श्वभूमी
लाड हे दोन दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष पदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. कुंडल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. जिल्हा परिषदेत गटनेते म्हणून काम केले. वडिल आमदार अरुण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या ते पदवीधर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपने उमेदवारीचा ‘शब्द’ दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जाते.