Ladki Bhaini Yojana
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहिम सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याने सरकारने आता कठोर निकष लागू केले आहेत. निवडणुकीच्या काळात लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी फार काटेकोरपणे करण्यात आली नव्हती. मात्र, वाढता आर्थिक भार लक्षात घेऊन अलीकडच्या काळात लाखो बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
यासोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला असून, आता योजनेतील महिला लाभार्थ्यांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता फक्त महिला लाभार्थ्यांचेच नव्हे, तर त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही काटेकोर चौकशी केली जाणार आहे.
जर महिलेचे लग्न झाले असेल, तर पतीचे उत्पन्न तपासले जाईल, तर अविवाहित महिलांच्या बाबतीत वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल. महिला लाभार्थीचे वैयक्तिक उत्पन्न कमी असले तरी कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे.
याआधी फक्त महिलांचे उत्पन्न तपासले जात होते. बहुतांश महिला गृहिणी असल्याने त्यांचे वैयक्तिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचे आढळले. मात्र, अनेक कुटुंबांचे मिळून उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्याने सरकारने आता पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य केली आहे.
Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in येथे जाऊन आवश्यक टप्पे पूर्ण करणे गरजेचे आहे.
संकेतस्थळावर गेल्यानंतर e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर संबंधित फॉर्म उघडतो. येथे लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती दिल्यानंतर Send OTP या बटणावर क्लिक करावे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून Submit वर क्लिक केल्यानंतर पुढील टप्पा सुरू होतो.
प्रणाली सर्वप्रथम तपासते की संबंधित लाभार्थ्याची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
जर ई-केवायसी पूर्ण असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जर पूर्ण नसेल, तर आधार क्रमांक पात्र यादीत आहे का हे तपासले जाईल.
आधार क्रमांक पात्र यादीत असल्यास पुढे लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करावी लागेल. त्यानंतर जात प्रवर्ग निवडणे आणि काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता (Declaration) करणे आवश्यक आहे.
कुटुंबातील सदस्य शासकीय/अर्धशासकीय सेवेत कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीवेतन घेत नाहीत.
कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
सर्व माहिती व घोषणा सबमिट केल्यानंतर शेवटी स्क्रीनवर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसतो.