मांडवगण फराटा : मांडवगण फराटा ता. शिरूर येथील श्री वाघेश्वर विद्याधाम विद्यालयात दुपारी दोन वाजता शालेय तासिका वेळेत अनेक शिक्षकत गौरहजर राहत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन उपाध्यक्ष व एक सदस्य हे मुख्याध्यापकांची भेट घेण्यासाठी दुपारी दोन वाजता गेले असता. अनेक वर्गांमध्ये गोंधळ सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्याची चौकशी करावी म्हणून ते ऑफिसमध्ये गेले तर मुख्याध्यापक ऑफिस, पर्यवेक्षक ऑफिस बंद असल्याचे चित्र त्यांना दिसले.
त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता शिपाई, इतर शिक्षक कोणीही काहीच सांगू शकले नाहीत. कोणत्या तरी वर्गावर मुख्याध्यापक असतील म्हणून वर्गखोल्या पहात गेले असता असे लक्षात आले की एकूण सात ते आठ वर्गावर एकही शिक्षक उपस्थित नाहीत. एक तासानंतर दोन फोर व्हीलर गेट मधून शाळेच्या आवारात येऊन उभ्या राहिल्या व त्यामधून आठ ते दहा शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक उतरले. चौकशी केली असता सर्वजण एका शिक्षकाच्या घरी आखडपार्टी करण्यासाठी गेले होते. असे समजले. मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
आम्ही सर्व गोष्टी नियमात करतो
मुख्याध्यापक रामदास चव्हाण हे मांडवगण फराटा येथील विद्याधाममध्ये रुजू झाल्यानंतर सर्व गोष्टी मी नियमात करीत आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थीच काय परंतु मी शिकक्षकांना सुद्धा गेटच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे छातीठोकपणे सांगत होते. परंतु आज स्वतःच अनेक शिक्षकांना घेऊन आखडपार्टी करण्यासाठी शालेय तासिका वेळेत गेले. आखाडमहिना सुरू झाल्यापासून असे कितीवेळा घडले असावे याबाबत कोणालाही माहिती नाही.
प्रकरण मिटविण्याचा अनेकांचा प्रयत्न
त्यातील बरेच शिक्षक गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या जवळचे असल्याने प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान महत्वाचे नसून शिक्षकांना वाचवणे महत्त्वाचे काहींना वाटत आहे. शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बालाजी कांबळे व सदस्य हनुमंत पंडित यांनी रितसर तक्रार जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे सुज्ञ पालकांनी समाधान व्यक्त केले. आता खरे जागरूक सदस्य शालेय व्यवस्थापन समितीवर आले आहेत. विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.