महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२८) महाबळेश्वर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Pallavi Patil) यांनी दिली.
महाबळेश्वर पालिकेत दहा प्रभागातून एकूण वीस जागांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यापूर्वी जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी दोन तर अनुसूचित जमातीसाठी एक अशा तीन जागांसाठीचे आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले असून, नागरिकांचा मागास प्रवर्गकरीत जागा आरक्षित केल्याने या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. मात्र, सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करून नागरिकांचा मागास प्रर्वग महिला व सर्वसाधारणसाठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे.
ओबीसींसाठी साधारणपणे पाच जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षण नक्की कोणत्या प्रभागात पडणार हे चित्र आरक्षण सोडतीवेळी स्पष्ट होणार आहे. ओबीसी आरक्षणाची सोडत करताना या जागा मागील सोडतीवेळी खुल्या सर्वसाधारण व महिला प्रवर्गासाठी असलेल्या जागांमधून देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातील पाच जागा कमी होणार आहेत. ही आरक्षण सोडत गुरुवारी सायंकाळी चार वाजता काढण्यात येणार आहे. या सोडतीचा कार्यक्रम खादी ग्रामोद्योग सभागृह बंगला क्र ५ महाबळेश्वर येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.