MahabaleshwarTourism: महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले; 2024 मध्ये पर्यटकांची संख्या थेट निम्म्यावर
मेढा/दत्तात्रय पवार: महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर-पाचगणीची ओळख असून वर्षाकाठी महाबळेश्वरला १८ ते २० लाख पर्यटक भेटी देत असतात. ही संख्या हळूहळू रोडावत असून अवघ्या साडेआठ लाखांवर यावर्षी ही संख्या आली आहे. पर्यटकांची पसंती ही कोकणाकडील पर्यटन स्थळांना वाढू लागल्याने ही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दरवर्षी उन्हाळी पावसाळी हंगामांसह दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर -पाचगणी पर्यटकांनी बहरलेले पाहायला मिळते. नगरपरिषदेकडील नोंदणी नुसार कोरोना प्रादुर्भावापूर्वी (२०२० पर्यंत) येथे १८ ते २० लाख पर्यटक येत होते. पुढील दोन वर्षात पर्यटनावर मर्यादा होत्या. कोरोना पश्चात २०२३ मध्ये महाबळेश्वरला १६ लाख २४ हजार २१७ पर्यटकांनी भेटी दिल्या. पूर्वीच्या तुलनेत ही घट चार लाखांची होती. नुकत्याच संपलेल्या २०२४ मध्ये आणखी घट होत हा आकडा ८ लाख ४८ हजार ५५५ वर आला आहे.
पर्यटकांची संख्या कमी होण्याची कारणे गेल्या काही वर्षात निवास हॉटेलसह विविध सुविधांच्या दरात महाबळेश्वर-पाचगणीत मोठी वाढ झाली आहे. येथे फिरताना विविध प्रकारचे स्थानिक करही पर्यटकांना अधिक प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या कोकणातील पर्यटन स्थळांना आता अधिक पसंती मिळू लागली आहे. पर्यटन स्थळांमध्ये नाविन्यता नसणे, छोट्या रस्त्यांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी, ही देखील पर्यटकांनी पाठ फिरवण्याची कारणे आहेत .येथील पर्यटन व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.गेल्या वर्षभरात लोकसभा-विधानसभा निवडणुका पाठोपाठ झाल्या व त्या नेमक्या उन्हाळी आणि दिवाळी हंगामात आल्या, आचारसंहिता नाकेबंदी यामुळे राज्यातील तसेच परराज्यातील अनेक पर्यटकांनी महाराष्ट्रात आणि महाबळेश्वरला येणे टाळले.
महाबळेश्वर येथे अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच
मुंबई,पुण्याहून येणारा पर्यटक राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट वेगाने महाबळेश्वर पर्यंत दाखल होतो. मात्र महाबळेश्वर मध्ये दाखल होताच वेण्णालेक जवळ नगरपरिषदेचा कर भरताच लेकजवळ अरुंद रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होते. व पर्यटकांना तासनतास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.अशीच परिस्थिती महाबळेश्वर मधील इतर पॉईंटवर जाताना अनुभवण्यास मिळत असल्याने पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त होत आहेत. गाडीतच त्यांना बसून रहावे लागत आहे.त्यातच वनविभागाच्या पॉईंट बंदबाबतच्या जाचक अटी अनेक पॉईंट सायंकाळी बंद केले जात असल्याने पर्यटकांना कोणताही आनंद घेता येत नाही. या वाहतूक कोंडीवर प्रशासन समन्वयाने कोणताही तोडगा काढत नसल्याने त्रस्त पर्यटक अन्य पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत. यामध्ये वनविभाग, पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याने वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा निघत नाही.
हेही वाचा: गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी लोकांची पहिली पसंती ‘महाबळेश्वर’ लाच का? ‘ही’ आहेत कारणं
निवडणूक आचारसंहितांचा पर्यटनावर परिणाम झाला असून शिवाय हॉटेल लॉज आणि आस्थापनांचा खर्च वाढल्याने त्याचा परिणाम पर्यटकांच्या खिशावरही होत आहे. वाढत्या खर्चाचा विचार करता पर्यटक नवा पर्यटनस्थळांना पसंती देऊ लागले आहेत.”
– योगेश पाटील मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी महाबळेश्वर परिषद
महाबळेश्वर-पाचगणी मध्ये स्थानिक व्यावसायिक हे पर्यटकांना “अतिथी देवो भव” समजून पर्यटकांचे उत्साहात स्वागत करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाचगणी-महाबळेश्वर मध्ये स्थानिक व्यावसायिक कमी झाले आहेत. बाहेरील व्यावसायिकांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून महाबळेश्वर-पाचगणी मध्ये आपले व्यवसाय सुरू केल्याने अतिथी देवो भव या प्रथेला खीळ बसली आहे.
हेही वाचा: Mahabaleshwar Weather: महाबळेश्वरात हुडहुडी! वेण्णालेक, लिंगमळा परिसरात थंडीचा कडाका वाढला
महाबळेश्वर शहरात अपुरी पार्किगव्यवस्था
शहरात पार्किंग व्यवस्था अपुरी पडत असल्याने शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. नगरपरिषदेकडून वाहनतळासाठी आरक्षित जागांवर वाहनतळ उभारणे आवश्यक असताना या जागांचा वाहनतळासाठी वापर होणे गरजेचे आहे.
पर्यटनवाढीच्या दृष्टीने पर्यटनमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात सर्व विभागांना सोबत घेऊन प्रयत्न केले जातील.तसेच पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील.लवकरच पर्यटनमहोत्सवाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.”
– संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा.