मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यांच्या निवडणुकाही जाहीर केल्या. पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही. राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तसेच, राज्यातील मागील पाच वर्षांतील राजकारणाची बदलेली परिस्थिती पाहत वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा कल जाणूनघेतला जात आहे.
इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून महाराष्ट्रातील जनतेने सरकार, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या कार्यपद्धतीवर आपले मत मांडले आहे. या सर्वेक्षणात जनतेचे समाधान आणि असंतोष याबाबतची महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण 15 जुलै ते 10 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात 1,36,436 लोकांची मते जाणून घेण्यात आली
इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार, राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 120 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास महायुतीला 42 टक्के तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.71 टक्के मते मिळाली होती. तर महायुतीला 43.55 टक्के मते होती. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज निवडणुका झाल्यास राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. महाविकास आघाडीला या निवडणुकीत 150-160 जागा मिळू शकतात. धक्कादायक म्हणजे ‘मुड ऑफ नेशन’च्या या सर्व्हेमध्ये मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेंना केवळ 3.1 टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.
सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील 25% लोक राज्य सरकारच्या कामकाजावर पूर्णपणे समाधानी आहेत, तर 34% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत. पण जवळपास 34% जनता सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत आहे. सरकारच्या कामगिरीबाबत जनतेमध्ये संमिश्र मत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
खासदारांच्या कामगिरीवर 32% लोक समाधानी आहेत, तर 22% लोक काही प्रमाणात समाधानी आहेत आणि तेवढेच लोक असमाधानी आहेत. त्याच वेळी, 41% लोक आमदारांच्या कामगिरीवर समाधानी आहेत, जे खासदारांच्या तुलनेत चांगले आहे. 26% लोक आमदारांच्या कामावर काहीसे समाधानी आहेत, तर 27% लोक असमाधानी आहेत. यावरून आमदारांच्या कामावर जनता अधिक समाधानी असल्याचे स्पष्ट होते.