Maharashtra ssc 10th Result Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्यातर्फे इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे २०२५ रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे. निकालाची थेट लिंक दुपारी १ वाजता सक्रिय करण्यात आली आहे, ज्याद्वारे विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतात. ही परीक्षा महाराष्ट्रभर ९ विभागांमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यासाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एसएससी परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली होती.
निकाल पाहण्यासाठी तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. यासाठी मुख्य संकेतस्थळ म्हणजे sscresult.mkcl.org आहे. परंतु जर हे संकेतस्थळ काही कारणास्तव उघडत नसेल, तर विद्यार्थी पर्यायी संकेतस्थळांवर जसे की sscresult.mahahsscboard.in किंवा results.digilocker.gov.in वर जाऊन देखील निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 94.81% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.02 टक्क्यांनी कमी आहे.
पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल ठरला असून, जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 816 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 97.26% इतकी आहे. पुणे जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 924 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 32 हजार 447 विद्यार्थी परीक्षेत बसले होते.
पुणे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी याबाबत माहिती दिली. पुणे विभागातून फेब्रुवारी-मार्च, 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 64 हजार 736 होती. यापैकी 2 लाख 63 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2 लाख 49 हजार 507 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 9 हजार 707 होती. त्यापैकी 9 हजार 565 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 5 हजार 883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ही टक्केवारी 61.50 इतकी आहे.
पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचे निकाल 91.85% तर, सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.83% लागला आहे. विभागातील तिन्ही जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, पुणे जिल्ह्यात 98.21%, अहमदनगर जिल्ह्यात 95.3% व सोलापूर जिल्ह्यात 96.10% हे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण पुण्यामध्ये 96.38%, अहमदनगरमध्ये 89.28% व सोलापूरमध्ये 90.4% आहे.
Maharashtra ssc 10th Result Live Updates : दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, मार्कशीट डाऊनलोड
१२वीनंतर १०वीतही कोकणचा दबदबा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीही कोकण विभागाने ९८.८२% एकूण उत्तीर्णतेसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाने पुन्हा एकदा सर्वोच्च यश मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
कोकण – ९८.८२ टक्के
कोल्हापूर – ९६.७८ टक्के
मुंबई – ९५.८४ टक्के
पुणे – ९४.८१ टक्के
नाशिक – ९३.०४ टक्के
अमरावती – ९२.९५ टक्के
संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के